राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: विज्ञानाधिष्ठित समाजसेवा आणि आर्थिक विचार

JSB Financial Blog    30-Apr-2026
|
 
 

राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज 
 
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील एक महान क्रांतीकारक संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी केवळ अध्यात्मच नाही, तर विज्ञान आणि अर्थशास्त्राची सांगड घालून समाजाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवला.
तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भात अमरावतीतल्या यावली इथे झाला.
 
 
समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणं हे तुकडोजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य होय. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘गुरुकुंज’ आश्रम इथे त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली. त्यांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातून त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच प्रस्तुत आहेत.
 
तुकडोजी महाराजांचा समाजसेवेचा पाया विज्ञानावर आधारित होता. त्यांनी 'अंधश्रद्धा' आणि 'कालबाह्य रूढी' यांना कडाडून विरोध केला. त्यांच्या मते, विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे. त्यांनी गावाला एक प्रयोगशाळा मानले आणि स्वच्छतेपासून ते ग्रामोद्योगापर्यंत प्रत्येक कार्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. 'स्वच्छता हाच खरा धर्म' हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडला.
 
 
आर्थिक विचार
 
 
महाराजांचे आर्थिक विचार ग्रामीण भारताच्या स्वावलंबनावर आधारित होते. त्यांच्या मते, जोपर्यंत गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत राष्ट्र बलवान होऊ शकत नाही. त्यांनी 'ग्रामोद्योगा'ला विशेष महत्त्व दिले. आपल्या गावातील कच्चा माल बाहेर न पाठवता, त्यावर गावातच प्रक्रिया करून वस्तू तयार कराव्यात, ज्यामुळे स्थानिक रोजगार वाढेल, हा त्यांचा विचार आजच्या 'व्होकल फॉर लोकल' (Vocal for Local) या संकल्पनेशी जुळणारा आहे.
 
त्यांनी विलासी खर्चाला विरोध करून 'काटकसर' आणि 'सामूहिक संपत्ती'च्या विनियोगाचा संदेश दिला. "प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील काही हिस्सा समाजाच्या आणि गावाच्या विकासासाठी खर्च करावा," हा त्यांचा सहकारी अर्थशास्त्राचा (Co-operative Economics) मूळ मंत्र होता.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनांतून आणि कार्यातून विज्ञानाची कास धरून आर्थिक विषमतेवर प्रहार केला. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच खरी समाजसेवा आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले. त्यांचा हा वारसा आजच्या डिजिटल युगातही मार्गदर्शक ठरतो.
 
 
संत परंपरा बघता तुकडोजी महाराजांचा काळ तसा अलीकडचा. म्हणजे त्यांच्याच काळात भारत स्वतंत्र झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवले. ब्रिटिशांच्या काळातच विद्यालय-महाविद्यालय-विद्यापीठ यांची ओळख भारताला झाली होती.
 
 
"शिक्षण देऊन केली दिवाळी, अज्ञानाची करूनी होळी, तुकड्या म्हणे मन रंगलं, आता खोटंनाटं नाही राहिलं, माझं गावच मंदिर शोभलं".
 
 
असा गावखेड्यांनीच आपला देश घडलेला आहे, खरा भारत खेड्यात आहे हे समजून उमजून त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली. केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणं हे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य.
 
 
तुकडोजी महाराजांनी जपानसारख्या देशात जाऊन विश्वबंधुत्वाचा विचार मांडला. आजचं आपलं नवं शिक्षण 'ग्लोबल सिटीजन' हाच विचार मांडतं. तुकडोजी महाराजांची स्वतःची वैचारिक बैठक अगदी पक्की होती आणि विचार अर्थातच प्रगल्भ होते. २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला. त्यांनी गावोगाव ‘गुरुदेव सेवामंडळं’ स्थापन केली. त्यांद्वारे आजही अनेक कार्यकर्ते मानवतेचा वसा घेऊन काम करत आहेत.
 
 
राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी संत होत. ‘मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहे.’ असं ते जनतेला ठणकावून सांगत. आपला परिचयही त्यांनी-
 
 
"मानवता है पंथ मेरा
इन्सानियत है धर्म मेरा"
 
असाच करून दिला आहे.
 
 
गावं स्वयंपूर्ण बनून तिथले लोक उद्यमशील आणि निर्व्यसनी कसे होतील याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं. गावागावात शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्याबरोबर बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. त्यांनी आदर्श समाजरचनेला सहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितलं. विद्यार्थीदशेतील मुलं-मुली यांच्या विकासावर त्यांचा कायम भर राहिला. ते म्हणतात,
 
 
“नुसते नको उच्चशिक्षण आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा.’’
 
 
आजचा शिक्षणाचा कृतिशील विचार तरी दुसरं काय सांगतो, सुचवतो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पूर्वीच ही संकल्पना मांडून ठेवली आहे.
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत.